
धाराशिवच्या खव्याची व पेढ्याची चवच लई भारी… संभाजीनगर – सोलापूर रस्त्यावरून जाणारी प्रत्येक एसटी इथं थांबा घेतेच
मराठवाडा : धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरी भूम तालुक्यातलं जैनधर्मीयांचे तीर्थक्षेत्र. चविष्ट व मधाळ पेढ्यासाठीही कुंथलगिरीची ख्याती. छत्रपती संभाजीनगर-सोलापूर रस्त्यावरून जाणारी प्रत्येक एसटी इथं थांबते. कुंथलगिरी फाट्यावरून पेढे खरेदी करणं हा नियमच बनून जातो. वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील खवा त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात पशुधनांची संख्या फार पूर्वीपासूनच अधिक आहे. त्यातही दुधाळ पशुधन मोठ्या संख्येने आहे.

अतिरिक्त ठरणाऱ्या दुधाचा प्रश्न व दुधाला दर मिळत नसल्याने या भागातील पशुपालकार्नीच खवानिर्मितीकडे मोर्चा वळविला..
कमी पावसाचा जिल्हा म्हणून धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्याची ओळख. मात्र, येथील शेतकऱ्यांनी शेतीसह पूरक व्यवसायाची जोडणी करत वर्षानुवर्षे आपली वेगळी ओळख दाखवून दिलीय. भूम व वाशी तालुक्यांतील नव्वदहून अधिक गावांत पाचशे ठिकाणी खव्याचे उत्पादन होते. पशुधन जोपासताना पाण्याची कमतरता, चाऱ्याचे वर्षागणिक वाढत जाणारे भाव, निसर्गाचा लहरीपणा त्याला तोंड देत नानाविध अडचणींचा सामना करत खवा उत्पादन केले जाते. मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू या मोठ्या शहरांसह राज्यात, परराज्यात दररोज ५० टनांपर्यंत खवा, पेढा येथुन पाठविला जातो.
आवडेल तिथे प्रवास योजना 2025 – सविस्तर बातमी
धाराशिव- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर १९७२ च्या दुष्काळावेळी सरमकुंडी येथील बापूराव गायकवाड यांनी प्रथम सरमकुंडी फाटा येथे पेढा विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर हळूहळू सरमकुंडीसह परिसरातील काही तरुण खवा व पेढा उत्पादन व विक्री व्यावसायात आले. बापूराव गायकवाड यांनी लावलेल्या पेढा विक्रीच्या व्यवसायाच्या रोपट्याचे काही वर्षांतच वृटवृक्षात रूपांतर झाले. ‘कुंथलगिरी पेढा’ या नावाने प्रसिद्ध असलेला हा पेढा महाराष्ट्रासह अन्य राज्यांत प्रसिद्ध झाला. विविध देवस्थाने, विविध यात्रांमध्ये या पेढ्याला कायमच मोठी मागणी असते. दिवसेंदिवस ती वाढतीच आहे.
कुंथलगिरी फाटा परिसरात होणारे पेढ्याचे उत्पादन एखाद्या मध्यम उद्योगाच्या उलाढालीपेक्षा कमी नाही. परिसरातील ३० किलोमीटरच्या परिघात असलेल्या गावागावांतून खवा तयार करण्याच्या भट्ट्या उभ्या आहेत. दुधाच्या सरकारी दराच्या तुलनेत खवा भट्टीवर मिळणारा दुधाचा भाव निश्चितच चांगला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा ओढा खवा भट्टीवर दूध घालण्याकडे जास्त आहे. गाय व म्हशीच्या दुधाचे वर्गीकरण करून या भट्ट्यांवर दूध घेतलं जातं. त्या तुलनेत दुधाला भावही मिळतो. धाराशिवच्या खव्याची व पेढ्याची चवच लई भारी…
भाविकांचीही या पेढ्यांना भरपूर मागणी
अनेक मंदिरांसमोर इथल्या खव्याचे कंदी पेढे हमखास उपलब्ध असतात. भाविकांचीही या पेढ्यांना भरपूर मागणी असते. हॉटेलमधले पेढे आणि कुंथलगिरीचे पेढे लगेच ओळखू येतात. इतकी त्यांची खासियत.सरमकुंडी फाट्यावर खव्याची आणि पेढ्याची जवळपास ५० दुकानं आहेत. औरंगाबाद, बीड, नांदेड, नागपूर यांसारख्या शहरांतून सोलापूर, धाराशिव, पंढरपूरकडे जाणारी सर्व वाहने याच रस्त्यावरून जातात. बीडहून निघाल्यानंतर ६० किलोमीटर अंतरावरचा हा स्पॉट आता पोटपूजेसाठी फेमस झालाय.
ताजा खवा आणि पेढा विकत घेऊन गरमागरम चहा आणि नाश्ता असा बेत असतो. इतकंच काय, अनेक कुटुंबं इथून जाता-येता किलो-किलो दोन-दोन किलो खवा आपल्या सोबत घेऊन जातात. इथे खवा घेतल्यानंतर तो घेणाऱ्यांनाही कमी किमतीत मिळतो, हे विशेष. राज्यभर बनावट खव्याची प्रकरणे प्रत्येक सणाच्या पार्श्वभूमीवर उघडकीस येतात. या परिस्थितीमध्येही सरमकुंडीच्या खवा व पेढ्यानं आपला अस्सलपणा सोडला नाही. राज्य व परराज्यातील शौकिनांची भूक सरमकुंडीच्या पेढ्यावरच तृप्त होते. येथील खव्याची पौष्टिकता आणि दर्जा पाहून केंद्र सरकारने याला जीआय मानंकन दिलंय. मुळातच या भागात शेतीला पाणी कमी असल्याने आणि हा परिसर डोंगराळ असल्यामुळे दिवसेंदिवस हा व्यावसाय करणारांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कुंथलगिरीच्या खव्याची निर्यात देशभरातील तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी होवू लागलीय. (धाराशिवच्या खव्याची व पेढ्याची चवच लई भारी…)